
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी, लोकप्रतिनिधींनी तालुका सोडला वाऱ्यावर
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात अनेक अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असून सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात अतिरिक्त कामाचा भार पडत आहे.परिणामी त्यांच्यावर मानसिक ताण वाढत चालला आहे.या कार्यालयात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निवासी नायब तहसीलदार हे रिक्त असून त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्याचबरोबर संजय गांधी योजना नायब तहसीलदार व महसूल नायब तहसीलदार ही अतिशय महत्त्वाची पदेही रिक्त आहेत. या मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींनी हा तालुका पूर्णतः वाऱ्यावर सोडला असल्याने या तालुक्याला कुणीही वालीच राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष वाढत आहे नागरिकांमध्ये याबाबत लोकप्रतिनिधींविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागाचे आमदार हे फक्त शोभेचे बाहुले झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. येथील तहसील कार्यालयात सध्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत त्यामध्ये
सहायक महसूल अधिकारी – १ पद
शिपाई – १ पद
महसूल सहाय्यक – ३ पदे
मंडळ अधिकारी – ३ पदे (नांदगाव खंडेश्वर,दाभा,धानोरा गुरव)
तलाठी – २ पदे (सातरगाव,आणि येवती)
या पदांची भरती अद्याप शासनाकडून करण्यात आलेली नाही. त्याचं प्रमाणे गेल्या सात वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत ही अजूनही आवश्यक सोयीसुविधांपासून वंचित आहे. त्याकरिता अमरावती जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) मार्फत सन 2024-25 मध्ये 45 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या निधीतून अधिकारी आणि कर्मचारी यांना नवीन टेबल,खुर्च्या, व स्वतंत्र केबिन तयार करण्याचे नियोजन आहे. या निधीची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता सुद्धा मिळालेली आहे. आणि तो निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.परंतु आजपर्यंतही प्रत्यक्ष रूपात कोणत्याही कामाला सुरूवातच करण्यात आलेली नाही.याशिवाय येथील शासकीय धान्य गोदामामध्ये स्वच्छतागृह आणि कर्मचाऱ्यांसाठी कामाची खोली तसेच झेंड्याजवळ स्टील रॅलिंग बसवण्याबाबतही तहसील कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा पत्रव्यवहार केला.मात्र निगरगट्ट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.या सर्व परिस्थितीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाची कामाबाबतची उदासीनता स्पष्ट होते.यासंदर्भात कोणताही अधिकारी उत्तर देण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांचा रोष दिवसे दिवस वाढत आहे.त्यामुळेनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत.अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.