
कृषी विभाग झोपेचे सोंग घेत असल्याने शेतकऱ्यांचे हाल,
शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
नांदगाव खंडेश्वर / पवन ठाकरे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात युरिया व डीएपी खतांचा तीव्र तुटवडा जाणवत असून, शेतकरी अक्षरशः खतासाठी एक केंद्र ते दुसऱ्या केंद्रात भटकंती करत आहेत. कापूस, सोयाबीन, तूर व मुग या पिकांची उशिरा पेरणी झाल्यामुळे व काही ठिकाणी तणनाशकांच्या दुष्परिणामामुळे पीक वाढ खुंटल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर युरिया व डीएपी खतांची तातडीने गरज निर्माण झाली आहे. मात्र अनेक कृषी केंद्रांमध्ये हे खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
शेतकऱ्यांवर बेकायदेशीर अटी, आर्थिक शोषण वाढले
काही खत विक्रेते युरिया हवे असल्यास इतर खतही घ्यावे लागेल, अशी अट घालून शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा लादत आहेत. यामुळे गरज नसलेले खत देखील खरेदी करावे लागत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. याशिवाय काही ठिकाणी युरिया शासकीय दराच्या तुलनेत जास्त दराने विकले जात असल्याचे शेतकऱ्यांनी उघड केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त होत आहे.
कृषी विभागाची ढिसाळ यंत्रणा, कारवाई कुठेच नाही
तालुक्यातील कृषी विभागाकडून खत विक्रेत्यांवर ना तपासणी केली जाते ना कठोर कारवाई केली जाते.शेतकऱ्यांकडून तक्रार केल्यानंतर केवळ थातूरमातूर चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येतो. अनेक कृषी केंद्रांमध्ये रेड बोर्ड अथवा स्टॉक बोर्ड व्यवस्थित लावलेले नाहीत जे की शेतकऱ्यांचा हक्काचा माहितीचा स्रोत आहे.
दोषींवर कठोर कारवाई करा.
ज्या कृषी केंद्रांमध्ये युरिया अथवा डीएपी स्टॉकमध्ये असूनही शेतकऱ्यांना ते खत देण्यात येत नाही अशा केंद्रांवर कठोर कारवाई करून त्यांच्या परवान्यांची तात्काळ रद्दबातल करण्यात यावी.अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी संतप्त शेतकरी करत आहेत.