शास्त्रज्ञांनी केली पिकाची पाहणी
उपाय योजनेबद्दल दिली माहिती
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, शेतीकामांमध्ये मोठा व्यत्यय आला आहे. एकीकडे पिकांना पाण्याची गरज असली तरी, या सततच्या पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे सोयाबीन पिकावर ‘येलो वेन मोझॅक‘ (पिवळा मोझॅक) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव अधिकच गंभीर झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतात कीटकनाशक फवारणी करणे अशक्य झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.यापूर्वीच्या काळात पोषक वातावरण मिळाल्याने वाढलेल्या ‘पांढरी माशी‘ या किडीने सोयाबीन पिकात रोगाचा प्रसार केला होता. आता रोगाची लक्षणे पिकावर स्पष्टपणे दिसत असतानाच, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना नियंत्रणाचे उपाय योजता येत नाहीत. यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे कठीण झाले आहे. तसेच, शेतात सतत पाणी साचून राहिल्याने आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पिकाची प्रतिकारशक्ती कमी होऊन रोगाची लक्षणे (पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे) अधिक तीव्रतेने दिसत आहेत.
कृषी प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना
या बिकट परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुका कृषी प्रशासनाने शास्त्रज्ञांच्या मदतीने विविध गावांतील शेतांना भेटी देऊन पाहणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना रोगाची लक्षणे आणि नियंत्रणाचे उपाय समजावून सांगितले जात आहेत. ‘शेतीशाळा’ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृतीवर भर दिला जात आहे.याच उपाययोजनांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, उद्या (दि. १५ सप्टेंबर) दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथे तालुका कृषी प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एका विशेष प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना पावसाने उघडीप देताच तातडीने काय उपाययोजना कराव्यात, यावर थेट मार्गदर्शन करणार आहेत.

कृषी विभागाकडून नियंत्रणासाठी सूचना
पावसाने उघडीप मिळताच रोगाचा पुढील प्रसार टाळण्यासाठी तालुका कृषी प्रशासनाने एकात्मिक व्यवस्थापनाचा सल्ला दिला आहे.
१. प्रतिबंधात्मक उपाय
रोगाची लक्षणे दिसणारी झाडे त्वरित मुळासकट उपटून शेताबाहेर नेऊन नष्ट करावीत, जेणेकरून विषाणूचा प्रसार थांबेल.
शेत आणि बांध तणमुक्त ठेवावेत.
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी १० ते १२ पिवळे चिकट सापळे लावावेत.
२. रासायनिक नियंत्रण (पावसाने उघडीप मिळताच फवारणीसाठी
पावसाने उघडीप दिल्यावर आणि फवारणीयोग्य परिस्थिती निर्माण होताच, पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी (प्रमाण प्रति १० लिटर पाणी):
थायमेथोक्झाम २५% डब्ल्यू. जी. – ४ ग्रॅम
इमिडाक्लोप्रिड १७.८% एस. एल. – ४ मिली
पायरीप्रॉक्सीफेन १०% + बायफेनथ्रीन १०% ई.सी. – २० मिली
शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, पावसाने उघडीप मिळताच कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच कीटकनाशकांची फवारणी करावी. तसेच, दुर्गापूर येथे आयोजित कार्यशाळेत सहभागी होऊन तज्ज्ञांकडून शास्त्रीय माहिती घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
