नागरिकांची कामे रखडली: नेमणुकीची मागणी
सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी वेधले लक्ष
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत गेल्या दोन महिन्यांपासून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पद रिक्त असल्याने विविध रोजगार हमी योजना कामकाजावर परिणाम होत आहे. या संदर्भात तालुका काँग्रेस कमिटी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी नरेगा आयुक्त नागपूर व जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे निवेदन दिले आहे.दिवटे यांनी निवेदनात नमूद केले आहे की,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नसल्यामुळे सिंचन विहिरी, गुरांचे गोठे तसेच इतर रोहयो अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामांना वेळेत मंजुरी मिळत नाही. प्रस्ताव सादर केल्यानंतरही पंधरा दिवसांत कामे पूर्ण होत नाहीत. कुशल बिले वेळेत पास होत नसल्याने शेतकरी व मजूर वर्ग अडचणीत येत आहे. तसेच घरकुलांच्या हजेरीपत्रक काढण्यातही दिरंगाई होत असून, ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचा कारभार सुरळीत पार पडावा, मजूर व लाभार्थ्यांची कामे वेळेत व्हावीत यासाठी तातडीने सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नेमावा, अशी मागणी मोरेश्वर दिवटे यांनी केली आहे.या निवेदनाच्या प्रती खासदार अमरबाबू काळे (वर्धा), खासदार बळवंत वानखडे (अमरावती), आमदार प्रताप अडसड (धामणगाव रेल्वे), माजी आमदार वीरेंद्र जगताप तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहेत.
