सत्तेत शिवसेना, पण नगरपंचायतीत शिवजयंतीच नाही!”
अविनाश ब्राम्हणवाडे यांनी पुढाकार घेत केला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नगरपंचायत कार्यालयातील प्रतिमेचे अधिकृत पूजन व कार्यक्रम न झाल्याने शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ४ वाजेपर्यंतही नगरपंचायत कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच अविनाश भाऊ ब्राह्मणवाडे यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत नगरपंचायत कार्यालयात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी केली.

नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे असतानाही शिवजयंतीसारखा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवस नगरपंचायतीत साजरा न केल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणात वापर करणाऱ्यांकडूनच त्यांच्या जयंतीकडे दुर्लक्ष होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.या प्रकरणी नगराध्यक्ष व प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
