
विकासकामांमुळे मिळाले मानांकन
शेतकऱ्याचा विश्वास सार्थकी लागला.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील ढेपे यांच्या नेतृत्वाखालील नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या दोन वर्षांत उल्लेखनीय विकास साधला असून त्याचे फलित म्हणून या बाजार समितीला नुकताच ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये बाजार समितीच्या माध्यमातून एकूण १ कोटी ७५ लाख रुपये खर्च करून विविध विकासकामांची पूर्तता करण्यात आली आहे. या कामांमध्ये शेतकऱ्यांच्या माल टाकण्यासाठी ६५x१०० चौरस फूट आकाराचे दोन लिलाव ओटे, ८० टन क्षमतेचा वजन काटा, तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेले अंतर्गत रस्ते आणि सौर ऊर्जा प्रणालीचा समावेश आहे.
*प्रस्तावित विकासकामे २.७५ कोटी रुपयांची*
सध्या जवळपास २ कोटी ७५ लाख रुपये किंमतीची विकासकामे प्रस्तावित असून त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन अंतर्गत १ कोटी ५२ लाख रुपये खर्चाचे काम अंतिम टप्प्यात असून यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ५०% अनुदान मंजूर झाले आहे. उर्वरित निधी बाजार समितीकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासोबतच, १ कोटी ३० लाख रुपये खर्चाचे ओपन लिलाव ओट्यावर टीन शेड उभारण्यात येणार आहेत.
प्रभात (पाटील)ढेपे,सभापती, कृ.ऊ.बा.स.नांदगाव खंडेश्वर
बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी ‘मेगा प्लान’
बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी संचालक मंडळाने एक मेगा प्लान तयार केला आहे. आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू केलेला आहे तालुक्यातील शेतकऱ्याचा आमच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास असून त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही.
श्री.विलास (पाटील) सावदे उपसभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती,नांदगाव खंडेश्वर
नियोजनबद्ध कामकाज आणि विश्वासाचे योगदान
संपूर्ण यशाचे श्रेय सर्व संचालक मंडळाला जात असून त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीला शेतकऱ्यांचा वाढता विश्वास तसेच अडते,व्यापारी व सर्व घटकांचे मिळालेले योग्य सहकार्य नेहमीच असते त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत.
अमित मोहोड,सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव खंडेश्वर