अभ्यासक्रमांचा लाभ घेण्याचे प्र. प्राचार्य सुरेश मेंढे यांचे युवक-युवतींना आवाहन
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने नांदगाव खंडेश्वर येथील एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ८ ऑक्टोबरपासून अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी तातडीने नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांनी केले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थींना “मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम” या कार्यक्रमातून प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निश्चित केले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ४१९ शासकीय आयटीआय आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २,५०६ तुकड्या ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, पहिल्या तुकडीचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नांदगाव खंडेश्वर आयटीआयमध्ये नेल टेक्निशियन, सेल्फ एम्प्लॉइड टेलर, शिवण मशीन ऑपरेटर, टी.आय.जी. वेल्डिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट, सी.सी. इन सिक्युरिटी अॅनॅलिस्ट, असिस्टंट प्लंबर (जनरल) व डिजिटल मित्र असे आठ अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांपैकी २५ टक्के जागा संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, उर्वरित जागा बाह्य उमेदवारांसाठी खुल्या आहेत. प्रवेशासाठी आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असलेले किंवा पूर्ण केलेले विद्यार्थी, तसेच उच्च व तंत्र शिक्षणातील पदविका, पदवीधारक आणि इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र आहेत. तरी परिसरातील इच्छुक युवक-युवतींनी नोंदणी करून किंवा थेट आयटीआयला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे आणि शिल्पनिदेशक यांनी केले आहे.
