
मंगरूळ चव्हाळा पारधी बेडा रस्त्याची दुरवस्था;
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा पारधी बेडा या गावांना जोडणाऱ्या 9 किमी रस्त्याची दुरवस्था स्थानिक नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. मंगरूळ चव्हाळा येथील पारधी बेडा या रस्त्याचा वापर करत असल्याने रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, स्थानिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या परिसरात कार्यरत असलेल्या डझनभर क्रशर खदानींमुळे खनिजकर्म विभागाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. मात्र, या रस्त्याच्या देखभाल आणि सुधारणेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जड वाहतुकीमुळे उडणारी विषारी धूळ, पावसाळ्यात चिखलमय रस्ते आणि गड्ड्यांमध्ये साचणारे पाणी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वाधिक त्रास शेतकरी, शाळकरी विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना सहन करावा लागत आहे. युवा एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे (अध्यक्ष) उमेश पवार व आदिवासी फासेपारधी बहुद्देशीय ग्रामीण लोक कल्याण संस्थेचे शिष्ट मंडळ यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधत रस्त्याचे सिमेंटरीकरण आणि मजबुतीकरण करण्याची मागणी केली आहे. मंगरूळ चव्हाळा पारधी बेडा रस्त्याची मागणीसाठी मंगरूळ चव्हाळा पारधी बेडा परिसरातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याच्या मुख्य आणि अमरावती जिल्हाधिकारी सौरभ काटिया यांच्याकडे निवेदन घेऊन पोहोचले आहे.ग्रामस्थांनी पक्के सिमेंट रस्ते बांधण्याची मागणी करत, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी विनंती केली आहे.
हा रस्ता आमच्या गावांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा आहे. शासनाला येथून कोट्यवधींचा महसूल मिळतो, पण आम्हाला मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिकांचे हाल होत आहेत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, ज्या ठिकाणी क्रशर प्लांटमुळे शासनाला उत्पन्न मिळते, तिथल्या सर्व रस्त्यांचे सिमेंटरीकरण करावे, अशी विनंती त्यांनी केली.स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.सिमेंटरीकरणामुळे प्रवास सुलभ होईल आणि परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. शासन आणि प्रशासन या मागणीवर कितपत त्वरित कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.