
अर्धवट माहिती देत संबंधितांची दिशाभूल;
अपील नंतरही माहिती नाकारली जाते ; जनतेत संताप
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत कार्यालयामध्ये माहिती अधिकार कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची गंभीर व धक्कादायक बाब समोर आली आहे. माहिती मागणाऱ्या नागरिकांना संपूर्ण व स्पष्ट माहिती न देता अर्धवट व दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.नगर पंचायत कार्यालयात पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता अभिजित लोखंडे हे बांधकाम विभागाचे जनमाहिती अधिकारी असून त्यांच्या कडून कामाची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात मागविण्यात आली होती. मात्र त्यांनी सादर केलेली माहिती ही अपूर्ण विस्कळीत व दिशाभूल करणारी आहे.माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत मागवलेली माहिती ही स्पष्ट संपूर्ण व वेळेत दिली जाणे आवश्यक असते. मात्र जनमाहिती अधिकारी लोखंडे यांनी संबंधित व्यक्तीस योग्य माहिती देण्याऐवजी वेळकाढूपणा केला असून अर्धवट माहिती देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला आहे.यामुळे संबंधित व्यक्तीने मुख्याधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. मुख्याधिकारी यांनी स्पष्ट आदेश देऊन माहिती सादर करण्यास सांगितले होते. तरीही अभिजित लोखंडे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत प्रशासनाचीही अवहेलना केल्याचे निदर्शनास आले आहे.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.अनेक नागरिकांनी आरोप केला आहे की,जनमाहिती अधिकारी लोखंडे हे अनेक वेळा माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करत असून, कोणालाही योग्य माहिती देण्यास टाळाटाळ करतात.अर्धवट माहिती देऊन लोकांना फेऱ्या मारायला लावणे त्यांना कंटाळवून माहिती मागण्यापासून परावृत्त करणे, ही त्यांची पद्धत असल्याचे बोलले जात आहे.या प्रकाराची गंभीर दखल घेत, जनमाहिती अधिकार्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी,अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांविरोधात तातडीने कठोर कारवाई करावी,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
संबंधित व्यक्तीचा माहितीच्या अधिकारात अर्ज प्राप्त झालेला होता.त्यांनी मागितलेल्या विषयावर परिपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
*अभिजित लोखंडे*
*अभियंता, स्वच्छता व* *पाणीपुरवठा विभाग नगरपंचायत* *नांदगाव खंडेश्वर*