
मोर्शी तहसील कार्यालयाच्या वेळ काढू धोरणामुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात
मोर्शी/ तालुका प्रतिनिधी
मोर्शी तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेला, शिव पानंद रस्ता गेल्या नऊ महिन्यापासून मोकळा करण्याच्या प्रतीक्षेत असून, शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचे उंबरठ्याचे झिजवून देखील केवळ राजकीय दबाव तंत्राने रस्ता मोकळा करून देण्यास तहसील कार्यालय टाळाटाळ करत असल्याने, या रस्त्यावरून वहिवाट करणाऱ्या वरला बोडणा येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याची तयारी असल्याचे सांगितले. रस्ता मोकळा करण्याकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर देखील केवळ दोन शेतकऱ्यांनी या पानांद रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. गेल्या नऊ महिन्यापासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील महसूल विभाग आज येतो उद्या येतो असे सांगून टाळाटाळ करीत आहे. यामुळे या रस्त्यावरून वहिवाट करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य खच्ची झाले असून, वैफल्यग्रस्त मनस्थितीत असलेले शेतकरी आम्हाला आता आत्महत्या शिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया देत आहे. येत्या दोन दिवसात रस्ता मोकळा झाला नाही तर पानंदरस्त्यावरच आमरण उपोषण करनार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता मोकळा करून देण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश असताना, केवळ काही राजकीय लोकांच्या दबावात तहसील कार्यालय रस्ता मोकळा करून देण्यास टाळाटाळ करीत असून, वैफल्यग्रस्त मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार तहसील कार्यालय राहणार असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले.