
शेतकऱ्यांना करण्यात आले मार्गदर्शन
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खं तालुक्यात मौजा मोखड व शिरपूर येथे मंगळवार, ०८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता हनुमान मंदिरात ‘बळीराजा संवाद अभियान’ अंतर्गत शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. सागर इंगोले व मंडळ कृषी अधिकारी अनिल वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित या सभेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कृषी विषयक विविध योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या शेती संबंधित समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करणे हा होता.या सभेला गावातील ग्रामपंचायत सदस्य, संताजी शेतकरी बचत गटाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाचे अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते. यामध्ये उप कृषी अधिकारी उदय गावंडे, सुनील शिरसाट, सहाय्यक कृषी अधिकारी अनिल पोच्छी आणि सचिन आंधळे यांचा समावेश होता.कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक कृषी अधिकारी अनिल पोच्छी यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर उप कृषी अधिकारी उदय गावंडे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज, सिंचनाच्या सोयी, खतांची उपलब्धता,पांदण रस्ते,शेतीला कुंपण मिळणे आणि बाजारपेठेतील दरांबाबतच्या अडचणी मांडल्या. उदय गावंडे यांनी प्रत्येक समस्येवर योग्य मार्गदर्शन केले आणि शासनाच्या संबंधित विभागांकडून योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या संवाद अभियानामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनेक महत्त्वाच्या योजनांची थेट माहिती मिळाली. या माहितीचा उपयोग करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे उत्पन्न वाढविण्यात निश्चितच मदत होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारच्या संवाद कार्यक्रमांमुळे शासन आणि शेतकरी यांच्यातील दुरावा कमी होऊन विकासाला गती मिळेल, असे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.