प्रहार शहराध्यक्ष मंगेश देवळे यांनी आमदार प्रताप अडसडकडे निवेदनाद्वारे केली मागणी
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर शहरात विविध जाती-धर्मांचे नागरिक वास्तव्यास असले तरी आजपर्यंत शहरात कोणत्याही महापुरुषांचे स्मारक उभारण्यात आलेले नाही. उलट आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यासारख्या महापुरुषांची भव्य स्मारके उभारण्यात आली असून नांदगाव खंडेश्वर शहर मात्र यापासून पूर्वीपासून वंचित राहिले आहे. ही फार मोठी शोकांतिका असल्याची खंत प्रस्तुत निवेदनात व्यक्त करण्यात आली.शहरातील तरुण पिढीला प्रेरणा मिळावी तसेच सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रनिर्मितीची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी नांदगाव खंडेश्वर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकांची उभारणी करण्यात यावी. याकरीता आमदार प्रताप अडसड यांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष मंगेश देवळे यांनी आमदार प्रताप अडसड यांना निवेदन देऊन केली.निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नगरसेवक वैभव कोंडवते, आशिष खंडार, कैलास चांदणे, बाळू देशमुख इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
