
चिखलदरा/एजाज खान
२९ जुलै हा दिवस जगभरात व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. 2010 ला सेंट पिटर्सबग येथे झालेल्या जागतिक बैठकीत ठरल्याप्रमाणे वाघांचे संवर्धन आणि जनजागृती साठी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे सेमाडोह संकुल येथे जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून मुख्य वनसंरक्षक सुश्री. जयोती बॅनर्जी तर अध्यक्षस्थानी क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक श्री. एम.आदर्श रेड्डी होते. याशिवाय मंचावर वनसंरक्षक श्री सुमित कुमार, सामाजिक वनीकरण, अमरावती व उपवनसंरक्षक श्री अग्रिम सैनी, मेळघाट प्रादेशिक, परतवाडा व तसेच मानद वन्यजीव रक्षक डॉ जयंत वडतकर व प्रा डॉ सावन देशमुख यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम दिप प्रज्वलन व वृक्ष पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव घारगे यांनी सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत सन्मानित केले.यावेळी प्रमुख अतिथी जयोती बॅनर्जी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भारतात वाघांच्या संवर्धनासाठी १९७३ साली “व्याघ्र प्रकल्प” योजना सुरू करण्यात आली त्यावेळी पहील्यांदा ९ जंगलाचा यामधे समावेश करण्यात आला होता यामधे आपल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा पहिल्या ०९ व्याघ्र प्रकल्पात समावेश असलेला प्रकल्प होता ही आपल्या साठी अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. मानद वन्यजीव रक्षक डॉ सावन देशमुख यांनी आपल्या भाषणात जंगलाचे संवर्धन करणारी खाकी सर्वात दुर्लक्षित असुन नुकताच वन कर्मचारी व पोलिसांवर असामाजिक तत्वांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला व आम्ही सर्व अशासकीय संस्था वन विभागाच्या पाठीशी उभे राहू असा विचार व्यक्त केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम.आदर्श रेड्डी, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांनी आपल्या अधिकारी व कर्मचारी यांनी मेळघाट घ्या संवर्धनासाठी केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन भविष्यात मेळघाटला राष्ट्रीय मानांकन मधे आणखी उंचीवर घेऊन जाण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु असे विचार व्यक्त केले.मेळघाटातील सिपना, गुगामल, अकोट व मेळघाट वन्यजीव विभाग अशा चार विभागांतील उत्कृष्ट वन अधिकारी, कर्मचारी व दैनिक वेतनिक यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे विजेत्यांचे प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. श्री राकेश महल्ले, ऑर्गनायझेशन फॉर कुला, श्री सर्वेश मराठे, अरण्यम संवर्धन सोसायटी, डॉ. श्री जयंत वडतकर, WECS, डॉ श्री सावन देशमुख CARS, डॉ श्री स्वप्नील सोनवणे, YNCS, श्री निलेश कांचनपुरे, WAR, श्री शुभम सायंके, WASA व श्री निशिकांत काळे, निसर्ग संवर्धन संस्था अश्या अशासकीय संस्थेचे अध्यक्षांना सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक डॉ जयंत वडतकर यांचे “वाघांचे संवर्धन आणि सध्यस्थिती” या विषयावर सादरीकरण पार पडले. यामधे डॉ वडतकर यांनी वाघांच्या संवर्धनासाठी भारतात केले गेलेले कायदे व टायगर प्रोजेक्ट योजनेचा संपूर्ण इतिहास उलगडून दाखवला व सध्या वाघांची वाढलेली संख्या ही सामायिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद केले, आपल्या सादरीकरणातून त्यांनी संपूर्ण जगातील वाघांची आकडेवारी व आपल्या देशातील वाघ संवर्धनातील यश याबाबत सखोल माहिती दिली. आज सुमारे ३०० नद्यांचा उगम या जंगलातून होतो त्यामुळे मानवाची पाण्याची गरज भागविण्यासाठी आज ही जंगले महत्त्वाची ठरत आहेत.आज वाढत्या व्याघ्र पर्यटनातून मोठ्या प्रमाणात पर्यटन विकास झाला असून त्यातुन स्थानिकांना रोजगार प्राप्त होत आहे. त्यामुळे फक्त जंगलासाठी नव्हे तर मानवाच्या अस्तित्वासाठी वाघांना वाचविले आवश्यक आहे असा संदेश यातून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री स्वप्नील राऊत, वनरक्षक, क्राइम सेल,अमरावती यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री अनंता नायसे, वनरक्षक, श्री दिनेश केंद्रे, वनरक्षक तसेच श्री आनंद विपट, ग्राफिक डिझाइनर यांनी अथक परिश्रम घेतले.