सचिन व सीमिते भोसले यांची पोलिसात तक्रार
समाजात संताप उसळला
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या गावात पारधी समाजातील सचिन हत्तरीस भोसले आणि पत्नी सीमिते भोसले या दांपत्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी दांपत्याने मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.तक्रारीनुसार आदिवासी फासे पारधी सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष मतीन भोसले यांनी गाडी अडवून सचिन भोसले आणि सीमिते भोसले यांना रोखले. त्यानंतर दोघांना शिवीगाळ करून अमानुष मारहाण करण्यात आली. सीमिते भोसले यांच्याशी छेडछाड व अपमानास्पद शब्द वापरल्याचा गंभीर आरोप पोलिसाना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला.

या प्रकरणात मतीन भोसले यांच्यासोबत काही स्थानिक मित्रमंडळींचा सहभाग असल्याचेही दांपत्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.या घटनेमुळे सचिन व सीमिते भोसले या दांपत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, त्यांना शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पारधी समाजातील नेत्याकडूनच असे कृत्य घडल्याने स्थानिक पातळीवर संतापाचे वातावरण पसरले आहे.या हल्ल्यामुळे पारधी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे.ही घटना केवळ एका कुटुंबावर झालेला हल्ला नाही तर संपूर्ण पारधी समाजाच्या अस्मितेवर आणि मानवी हक्कांवर झालेला आघात आहे. त्यामुळे दोषींना तातडीने अटक झाली पाहिजे, अन्यथा याविरुद्ध आंदोलन छेडले जाईल अशी भूमिका समाजातील कार्यकर्त्यांनी जाहीर केली आहे.पारधी समाजातील संघटनांनी पीडितेला कायदेशीर मदत संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय मतीन भोसले याचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासून या प्रकरणातील इतर सहभागींचा शोध घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.मात्र पोलिस प्रशासनावर कारवाईत टाळाटाळ होत असल्याचा आरोप तक्रार कर्त्यानि केला आहे. तक्रार करते सचिन व सीमिते भोसले यांनी मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही तत्काळ कारवाई होत नसल्याने समाजातील प्रतिनिधींनी म्हटले आहे की, पोलिसांनी २४ तासांत गुन्हा नोंदवला नाही तर आम्ही जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेणार आहोत असा इशारा दिला आहे.
