
ग्रामस्थ उघड्यावर शौचाला जाण्यास मजबूर
ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा हे गाव आकाराने मोठं असूनही ‘हागणदारी मुक्त’ योजनेपासून कोसो दूर आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्यात आले असून गावागावात स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न झाला.मात्र मंगरूळ चव्हाळा येथे या योजनेची अंमलबजावणी फक्त कागदोपत्रीच झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
गावात चार ते पाच ठिकाणी सार्वजनिक स्वच्छालये उभारण्यात आली आहेत. मात्र ही स्वच्छालये अक्षरशः धूळखात असून त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.काही ठिकाणी संडासची सीटच नाही, कुठे नळच नाही तर पाण्याची व्यवस्था तर जवळपास नाहीच. त्यातच अनेक स्वच्छालयांभोवती झाडंझुडपं, कचरा, घाणीचा साठा झालेला असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या स्थितीमुळे ग्रामस्थांना उघड्यावर शौचास जावे लागत असून, त्यामुळे संक्रामक आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती आणखीच त्रासदायक आहे. शासनाच्या योजनेत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छालये बांधण्यावर भर दिला जातो. काही ठिकाणी महिलांनी आपल्या दागिन्यांपर्यंत विकून शौचालय उभारले आहेत, मात्र येथे ग्रामपंचायतीची उदासीनता स्पष्टपणे जाणवते.
ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांनी सार्वजनिक स्वच्छालयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही काहीच उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.ग्रामस्थांची मागणी आहे की सार्वजनिक स्वच्छालये तातडीने दुरुस्त करून नियमित स्वच्छता आणि देखरेखीची जबाबदारी निश्चित करावी.अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाचा इशाराही देत आहेत. सरकारने हागणदारीमुक्त गावाचा नारा दिला असला, तरी प्रत्यक्षात मंगरूळ चव्हाळा हे गाव अजूनही मूलभूत स्वच्छता सुविधांपासून वंचित आहे हे वास्तव नाकारता येणार नाही.