
गावात भव्य मिरवणुकिसह वैचारिक कार्यक्रम सुद्धा संपन्न
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
मंगरूळ चवाळा येथे दरवर्षी १ ऑगस्ट ला साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असते. आपल्या साहित्यांच्या माध्यमातून देश विदेशात पोहचलेले अण्णाभाऊंची १०५ वी जयंती सर्व जनमाणसांत साजरी झाली. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. वयाच्या १०व्या दिवशी २२७ मैलांचा पायी प्रवास करत कुटुंबियांसह त्यांनी मुंबई गाठले. तिथे त्यांनी हमाली, कोळसे वेचणे, गिरणीत झाडु मारणे, घरगडी अशी असंख्य मिळतील ती कामे केली. नंतर कापड गिरणीत काम करताना ते कामगार चळवळीत उतरले आणि शेवटपर्यंत कम्युनिस्ट कलापथकाच्या माध्यमातून कामगारांना जागृत करण्याचे काम केले. अण्णाभाऊ जसे जीवन जगले त्यावरच त्यांनी साहित्य निर्मिती केली. म्हणून त्यांचे साहित्य वास्तवदर्शी असून काळजाला भिडते. प्रस्थापितांनी नाकारलेल्या चोर, दरोडेखोर, कामगार, कष्टकरी, वेश्या यांना आपल्या साहित्यात अण्याभाऊंनी नायक नायिका बनविले. यातुनच सुप्रसिद्ध फकिरा, वारणेचा वाघ, वैजयंता, माकडीचा माळ यांसारख्या कादंबऱ्यांचा जन्म झाला. फक्त दिड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन, शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली. त्यांच्या साहित्याची भाषांतरे जगभरातील २७ भाषेत झाली आहेत. त्यांचे साहित्य आजही प्रत्येकाला अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत देते. कामगार चळवळ, स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यामध्ये अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर या तीन शाहिरांची फौज लोकांमध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण करत होती.
याच प्रेरणेची सद्यस्थितीत सुद्धा गरज असल्याने मंगरूळ चवाळा येथे मुख्य आयोजक हनुमान शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुसंख्य समाजबांधव व गावकरी समवेत गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली व सोबतच लोकांमध्ये अण्णाभाऊंचे विचार पोहचून विचारमंथन व्हावे यासाठी भाषणांचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला यामध्ये मनोज गावनेर, संतोष सुरजूसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच वैष्णवी शिंदे यांनी अण्णाभाऊंचा सर्व इतिहास व संघर्ष जमलेल्या लोकांना सांगितला. मिरवणूक व सर्व कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पडावा यासाठी सर्व समाजबांधवांनी प्रयत्न केले.