रेणुका मातेला पंचामृत अभिषेक, छबिना व महाआरतीने भक्तिभावाचा जल्लोष
माहूरगड/ संजय घोगरे
ललित पंचमीच्या पावन दिवशी माहूरगडावर रेणुका मातेला भक्तिभावाने व पारंपरिक वैभवात पूजा-अर्चा करून उत्सव साजरा करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांनी आपल्या कलांची सेवा श्री चरणी अर्पण केली. या विशेष प्रसंगी रात्र भर चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.ललित पंचमी निमित्त श्री रेणुका मातेला पंचामृत महाअभिषेक करून शेंदूर लेपन करण्यात आले. त्यानंतर देवीचा शृंगार, मळवट व नारंगी महावस्त्र अर्पण करण्यात आले. घटपूजा करून देवीला पुरातन अलंकारांनी भूषविण्यात आले आणि महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.मुख्य पुजारी प्रतिनिधी उज्वल भोपी व अमित भोपी यांच्या हस्ते कुमारिका पूजनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर रेणुका मातेला छबीना काढून प्रदक्षिणा घालण्यात आली. या छबीन्याचे मानकरी म्हणून संभाजी शिवाजी भोपी, उज्वल राजकुमार भोपी, अमित किरण भोपी, पवन भोपी व चंडिकासदास भोपी यांना मान मिळाला.

छबीनंतर भाविकांकडून अर्पण करण्यात आलेल्या फळांची आकर्षक आरास भवानीदास भोपी, शुभम भोपी व दुर्गादास भोपी यांनी केली. पुराचा नेवेद्य अर्पण करून दुसरी महाआरती संपन्न झाली. दिवसभर भाविकांच्या गर्दीने माहूरगड परिसर गजबजलेला होता.ललित पंचमी निमित्त कलाकारांनीही आपली कला सादर करून वातावरण रंगवले.“आपली कला देवीच्या चरणी अर्पण केल्यास तिच्या कृपेने अधिक वृद्धिंगत होते” या श्रद्धेतून अनेक कलावंतांनी उपस्थिती दर्शवली.या धार्मिक व सांस्कृतिक उत्सवामुळे माहूरगडावर भक्तिभाव, श्रद्धा आणि कलाविष्काराचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला असल्याची भावना भक्तांमधून व्यक्त करण्यात आली.
