
माहूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
माहूर / तालुका प्रतिनिधी
संजय घोगरे माहूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक गुमानसिंग चुंगडे (ठाकूर)यांची कन्या नेहा ठाकूर हिने सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाउंटंट बनली आहे. आज रविवारी(ता.6)आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर निकाल लागल्याने नेहाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सर्वच स्तरातून नेहाचे अभिनंदन होत आहे. निकाल जाहीर होताच आणि कुटुंबाला नेहाच्या निवडीची बातमी कळताच घरात आनंदी आनंद पसरले. कुटुंबाने एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला.कुटुंबीयांनी तिला पुष्पहार घालून तिचे स्वागत केले. तिच्या यशाबद्दल बोलताना नेहा म्हणाली की, तिच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर तिने नांदेडमधील यशवंत महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली, त्यानंतर तिने अकोल्यात वर्ग घेतले, या यशात अनेक अडथळे आले, परंतु नेहाने हार मानली नाही आणि यश मिळवले. ध्येय मोठे असेल तर अडथळेही मोठे असतात. कठोर परिश्रम, सकारात्मक विचार आणि संयमाने अडथळे दूर होतात आणि यश मिळते. जर कोणी अपयशी ठरला तर त्याने निराश होऊ नये, उलट त्याने त्याच्या चुका समजून घ्याव्यात आणि त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करावेत, तर त्याला नक्कीच यश मिळेल असे नेहा म्हणाली.माहूर तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून माहूर तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी,गजानन भारती, राज ठाकूर, बालाजी कोंडे, अपिल बेलखोडे,यांनी तिचा भेट वस्तू देऊन सत्कार केला.या वेळी छतनसिंग चुंगडे ,प्रीतम चिंगडे यांच्यासह कुटुंबाची उपस्थिती होती.माहूर सारख्या ग्रामीण भागातील नेहा ने सीए परीक्षा उत्तीर्ण होणे ही माहूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.