माहूर / संजय घोगरे
माहूर तालुक्यातील बंजारा व आदिवासी समाजामध्ये दरवर्षी विविध सांस्कृतिक उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. बंजारा समाजातील सर्वात महत्त्वाचा व मोठा समजला जाणारा तीज महोत्सव यंदा देखील अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.१७ ऑगस्ट २०२५ रोजी माहूर येथील पैनगंगा नदीच्या तीरावर या महोत्सवाची सांगता करण्यात आली. या वेळी तालुक्यातील तसेच परिसरातील असंख्य बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलं, मुलींपासून ते वयोवृद्ध समाजबांधवांपर्यंत सर्वांनी मोठ्या श्रद्धा व उत्साहाने सहभाग घेतला.
तीज महोत्सवाचे महत्त्व
बंजारा समाजामध्ये तीज महोत्सवाला विशेष धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या महोत्सवाला सुरुवात होते. ज्यांना मुली आहेत, त्यांच्या घरात हा उत्सव पारंपरिक रीतिरिवाजांनुसार पेरला जातो.वारुळाची माती आणून त्यामध्ये गव्हाचे दाणे पेरले जातात. नऊ दिवस या पेरणीची मनोभावे पूजा केली जाते. दहाव्या दिवशी हे धान्य कापून देवाला तसेच ज्येष्ठांना अर्पण केले जाते. यातून भावाच्या सुरक्षिततेची आणि समृद्धीची भावना व्यक्त होते, तसेच मातृप्रधान संस्कृतीचे आणि कुटुंबातील ऐक्याचे प्रतीक या सणामध्ये दिसून येते.या पारंपरिक विधींमध्ये ज्येष्ठ महिला खाली बसून पूजा करतात, तर मोठी मंडळी उभे राहून आरती करतात. ही परंपरा केवळ माहूरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात अत्यंत श्रद्धा व निष्ठेने पाळली जाते.वाजत-गाजत सांगता यंदा माहूर येथे तीज महोत्सवाची सांगता पैनगंगा तीरावर अतिशय वाजत-गाजत, पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात पार पडली. पारंपरिक पोशाखात आलेल्या समाजबांधवांच्या उपस्थितीमुळे संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडले.या प्रसंगी विविध धार्मिक विधी, आरत्या, नृत्य-गायनाने परिसर दुमदुमून गेला होता. असंख्य बंजारा बांधवांनी उपस्थित राहून हा महोत्सव यशस्वी केला.
