३८ गोवंश जनावरांना जीवनदान, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत ३८ गोवंश जनावरे जप्त करून त्यांना जीवनदान दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, सदर प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीणमध्ये गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी होणाऱ्या वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मागील काही दिवसांपासून सतत कारवाया सुरू आहेत.दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पो.उप.नि. विशाल रोकडे यांना गुप्त माहिती मिळाली की, नांदगाव खंडेश्वरकडून अमरावतीच्या दिशेने एका दहा चाकी ट्रकमध्ये जनावरांना बांधून कत्तलीसाठी क्रूरपणे वाहतूक केली जात आहे.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोर माहुली जवळील रस्त्यावर नाकाबंदी केली.

पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने पोलिस सरजंटला धडक देत ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून ट्रक थांबविला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेले आरोपी अमिर अली दाऊद अली (वय २९, रा. वंदेई नगर, नागपूर,मोहम्मद रिजवान मोहम्मद मुस्तफा (वय ४०, रा. यशोधरा नगर, नागपूर,सदर ट्रकमध्ये एकूण ३८ गोवंश जनावरे आढळली,ज्यांची किंमत सुमारे ४ लाख रुपये असून, ट्रकासह एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जप्त जनावरे व ट्रक पुढील कार्यवाहीसाठी पोस्टे लोणी यांच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पो.उप.नि. विशाल रोकडे यांच्यासह पोलिस अमलदार संतोष तेलंग, दीपक पाल, राजेश कासोटे, दीपक पाटील, मारोती वैद्य व चालक किशोर सुने यांनी सहभाग घेतला.या धडक कारवाईमुळे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
