
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
नेट मिटर बसविण्याकरीता रिलीज ऑर्डर काढण्यासाठी लाचेची मागणी करणे आणि लाचलूचपत विभागाने रचलेल्या सापळा कारवाई दरम्यान लाच स्विकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक होणे हे दोन्ही कृत्य महावितरणची जनसामान्यातील प्रतिमा मलिन करणारे असल्याने सहाय्यक अभियंता वरूड -२ उपविभाग,यांना महावितरणच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मुख्य अभियंता यांनी ही कारवाई केली आहे.महावितरणकडून ग्राहकाभिमूख सेवा देण्याचा सर्वोत्तोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.तथापि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार सहाय्यक अभियंता वरूड -२ उपविभाग , यांनी तक्रारदार दिलीप शंकरराव खेरडे ,व्यवसाय सोलर कृष्णा सोल एनर्जी यांना विक्रांत झामडे आणि सुनिता झामडे यांच्या घरी प्रत्येकी दोन किलोवॅटचे रूफ टॉपसाठी नेट मिटर बसविण्याकरीता रिलीज ऑर्डर काढण्याकरीता लाचेची मागणी केली आणि लाचलुचपत विभागाने केलेल्या सापळा कारवाई दरम्यान लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत पोलीस स्टेशन वरूड येथे (दि.५ जुलै) गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. मुळात महावितरणच्या कामासाठी लाच मागणे आणि लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक होणे, सहाय्यक अभियंता यांचे हे दोन्ही कृत्य अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आणि महावितरण सेवाविनिमय २००५ च्या तरतुदीच्या विरोधात आहे. त्यामुळे सहाय्यक अभियंता यांना महावितरणच्या सेवेत राहू देणे हे महावितरणच्या हितसंबंधास आणि कामकाजात बाधा निर्माण करणारे असल्याने महावितरणकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.