जिल्हाध्यक्ष पदी विठ्ठल जाधव तर सचिव म्हणून हनुमान सिडाम यांची सर्वानुमते निवड
न्याय मागण्यांसाठी लढा उभारणार
धामणगाव रेल्वे /तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी पंचायत संघटनेच्या सभेत जिल्हाध्यक्ष पदी विठ्ठल जाधव तर सचिव म्हणून हनुमान सिडाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.दरम्यान आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी पंचायत संघटना जिल्हा शाखा अमरावती ची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले.या सभेमध्ये नव्याने जिल्हाध्यक्ष म्हणून चिखलदरा येथील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव, सचिव म्हणून अमरावती येथील हनुमान सिडाम, उपाध्यक्ष म्हणून पंचायत समिती अचलपूर ईश्वरदास सातंगे यांची एकमताने निवड करण्यात आली.विस्तार अधिकारी पंचायत यांच्याकडे अधिनस्त ग्रामपंचायतीचे पर्यवेक्षण नियंत्रण आणि अनेक प्रकारच्या तक्रारी योजना सांभाळण्याचे काम असतांनाही विस्तार अधिकारी यांना पाहिजे त्या प्रमाणात न्याय न मिळाल्याने अनेक समस्या प्रलंबित आहे.या उद्देशाने सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले व राज्य शासन आणि विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयाला निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.
