
भाकपची मागणी ; मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
नांदगांव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
साहित्यसम्राट ,लोकशाहीर कॉ .अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट हा जन्मदिवस ” लेखन प्रेरणा दिवस ” म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषित करून या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शिलेदाराचा सन्मान करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने करण्यात आली आहे .कॉ . अण्णा भाऊ साठे यांनी विपुल लेखन केले आहे.
आपल्या अवघ्या ४९ वर्षाच्या आयुष्यात जेमतेम अक्षर ओळख असलेल्या या साहित्य सम्राटाने येथील कष्टकरी वंचित बहुजन वर्गाच्या दुःखाला आपल्या लेखणीने वाचा फोडली . ३७ कादंबऱ्या , ११ कथासंग्रह , ११ लोकनाट्य , २ नाटक ,७ चित्रपट कथा या विपूल साहित्यातुन या जनयोध्याने जनविद्रोह उभा केला होता . कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा हाती घेवून या महान योध्याने कष्टकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे . रशियाच्या धरतीवर छत्रपती शिवरायाचा पोवाडा सादर करणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे . मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉ .अण्णा भाऊ साठे यांचे कार्य खुप मोलाचे आहे . शाहीर कॉ . गव्हाणकर , शाहीर कॉ . अमर शेख यांच्या साथीने आपल्या पहाडी आवाजात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून दिल्लीच्या तख्ताला मराठी बाणा दाखवून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची ज्योत पेटविण्याचे काम या लोकशाहीराने जीवाची बाजी लावून केले . ये आजादी झुठी है , देश की जनता भूखी है असे ठणकावून सांगणारा कष्टकऱ्यांचा आवाज म्हणजे अण्णाभाऊ साठे . गिरणगांवाल्या कष्टकरी वस्तीत राहून गिरणी कामगार असलेल्या अण्णा भाऊंना महाराष्ट्राचे मॅक्झीम गोर्की म्हटले तर वावगे ठरणार नाही . अशा या संघर्ष योध्याच्या जीवन परिचयातुन नवीन पिढीला लेखनाची प्रेरणा मिळते म्हणून त्यांचा जन्मदिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषीत करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका कौंसिल नांदगांव खंडेश्वर यांचे वतीने मा .मुख्यमंत्री यांचे नावे तहसिलदार नांदगाव खंडे . मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे . निवेदन देतेवेळी भाकप जिल्हा सचिव कॉ .सुनिल मेटकर , तालुका सचिव कॉ . संतोष सुरजुसे , कॉ . प्रज्वल ढोके , कॉ इस्राईल शहा , कॉ मनोज गावनर , संतोष कुकडे , ज्ञानेश्वर सुरजुसे , कॉ .उमंग गावनर यांची उपस्थिती होती .