अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अकोला येथील गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘ स्व. सिंधुताई सपकाळ स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ अमरावतीच्या होमिओपॅथिक तज्ञ व कौन्सेलर डॉ राणी ने. चौधरी यांना प्रदान करण्यात आला. होमिओपॅथी क्षेत्रातील १७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक बांधिलकी जपून केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले. व्यावसायिक कौशल्यासोबतच सामाजिक तळमळ म्हणून डॉ चौधरी यांचेकडून विविध ठिकाणी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येतात. तसेच रहाटगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे अगदी माफक दरात होमिओपॅथिक औषधोपचार करण्यात येतात. वैद्यकिय क्षेत्रासोबतच साहित्यिक क्षेत्रात देखील त्यांनी अलौकिक असे स्थान मिळविले आहे. साहित्यिक क्षेत्रातील त्यांची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. विविध काव्यसंग्रहात त्यांचे लेख आणि कविता प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांच्या याच प्रेरणादायी कार्याची दखल प्रतिष्ठानचे संस्थापक श्री रोहन बुंदेले यांनी घेतली. मान्यवरांच्या मांदियाळीत हा सोहळा श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकोला मनपाच्या महापौर सौ शारदाताई खेडकर, महिला व बालकल्याण सभापती सौ आरती प्रकाश घोगलिया यांची उपस्थिती लाभली. सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि श्री शिवाजी महाविद्यालयाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखा प्रमुख प्रा. संजयजी तिडके यांच्या हस्ते डॉ. चौधरी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल वैद्यकीय , सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. चौधरी यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत.
