जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन
भूमापन, फेरफार, एकत्रिकरण तक्रारींवर थेट सुनावणी
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेनुसार नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी व वेळेत निवारण करण्याच्या उद्देशाने तालुकास्तरावर जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.या जनता दरबाराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख,अमरावती श्री. महेशकुमार शिंदे हे उपस्थित होते.

जनता दरबारात भूमी अभिलेख विभागाशी संबंधित भूमापन, नगर भूमापन, फेरफार, एकत्रिकरण आदी विषयांवरील नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींचा श्री. शिंदे यांनी सखोल आढावा घेत प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून सूचना दिल्यात. या जनता दरबारात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांना थेट आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने अनेक तक्रारींचे जागेवरच तत्काळ निराकरण झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला.जनता दरबारात उपस्थित राहून लाभ घेतल्याबद्दल उपअधीक्षक भूमी अभिलेख, नांदगाव खंडेश्वर श्री. निशांत नागरगोजे यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले. सदर जनता दरबार यशस्वी होण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी श्रीमती आखतकर, कुमारी चौहान, श्री. महल्ले, श्री. कापसे, श्री. घनमोडे, श्री. भुयार, श्री. भगत, श्री. घावडे, श्री. माने, कुमारी डोंगरे व कुमारी गांजरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
