अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
महिलांचे आरोग्य सुदृढ असले तरच कुटुंब आणि समाजाची आरोग्यदृष्टी देखील बळकट राहील, या उद्देशाने 20 सप्टेंबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष अभियान राबवले गेले. यामध्ये 107 मुली व महिला यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचा शुभारंभ पत्रकार श्री.द्रोणाचार्य कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहशिक्षिका श्रीमती.वंदना कांबळे उपस्थित होत्या. तर सदर शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. शिबिरास मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहिणी जाधव व आरोग्य निरीक्षक श्री.ओमप्रकाश भोजने तसेच आरोग्य सहायिका श्रीमती.शबाना शेख यांनी केलं. सदर शिबिर यशस्वीतेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत रूमणे, आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले, श्री.जयपाल रुपनर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.करण सरवदे, आरोग्यसेविका श्रीमती.सी.के जाधव व सर्व आशा स्वंयसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतळे या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या गेल्या आहेत. यामध्ये महिलांचे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी केली. जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन केले गेले. गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी व समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन आणि बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण पुढील काळात करण्यात येणार आहे. आयुष सेवांच्या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्द व नॅचरोपॅथी इत्यादी पर्यायी उपचार पध्दतींची सेवा गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
