बससेवा आणि जीओ कंपनी विरोधात ठाम भूमिका
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
मौजा खेड पिंपरी गट ग्रामपंचायतीत १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या जनसुविधा विषयांवर चर्चा झाली. यावेळी दोन मुख्य प्रश्न गाजले जीओ नेटवर्क सुविधा नसणे आणि एसटी बस सेवेपासून गाव वंचित असणे.ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठराव घेतला की, जीओ कंपनीकडून योग्य नेटवर्क सुविधा न मिळाल्याने रिचार्जचा संपूर्ण पैसा वाया जात आहे. कंपनी ग्रामीण भागातील नागरिकांची फसवणूक करीत असल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी जीओ कंपनीच्या मॅनेजरशी चर्चा करून, त्वरित नेटवर्क सुविधा न दिल्यास गावातील ७,००० सिमकार्ड वापरकर्ते सेवा बंद करून दुसऱ्या कंपनीकडे वळतील, असा इशारा दिला. तसेच अमरावती कार्यालयासमोर सिमकार्ड तोडून फेकण्याचा इशाराही सरपंचांनी दिला.याशिवाय अनेक वर्षांपासून खेड पिंपरीस एसटी बस सेवा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व रुग्णांना दवाखान्यासाठी प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. या समस्येवर तोडगा म्हणून सरपंच कांबळे यांनी अमरावती–नेर परसोपंत बससेवा पापड–खेड पिंपरी–पिंपळगाव निपाणी–शिंगणापूर मार्गे सुरू करण्याचे निवेदन राज्य परिवहन नियंत्रक अधिकारी, अमरावती व वाहतूक विभागाचे DTO अधिकारी रायलवार यांना दिले.सरपंचांनी सांगितले की, ही बससेवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरेल. शिक्षण, आरोग्य व दैनंदिन गरजांसाठी हा मार्ग अत्यंत आवश्यक असून, बससेवा सुरू झाल्यास राजापेठ, बडनेरा, माऊलीचोर, धानोरा गुरव, हिवरा मुरडे, पापड, खेड पिंपरी, पिंपळगाव निपाणी, सालोड, मंगरूळ चव्हळा, शिंगणापूर, वाटफळी, लोणी व नेर परसोपंत या गावांचा समावेश होणार आहे.या निवेदनावेळी सरपंच मंगेश कांबळे यांच्यासोबत शिवम चौधरी, ईश्वर विटकरे, आकाश भोंडे, ओम शेळके, रुपेश राऊत, अजय चौधरी, महेश विटकरे, रैना आंबडारे आदी उपस्थित होते. परिवहन विभागाने यावर सकारात्मक भूमिका घेतल्याने सरपंचांनी ग्रामस्थांच्या वतीने अधिकारी रायलवार यांचे आभार मानले.
