स्मार्ट मीटर की स्मार्ट घोटाळा?अर्धवट पाणी योजनेला ₹2.31 लाखांचा करंट
तक्रारीनंतरही कारवाई नाही ग्रामपंचायतीचा संताप
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या जावरा मोळवण येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली.
या योजनेसाठी नवीन इलेक्ट्रिक कनेक्शनची मागणी करण्यात ग्राम पंचायतीच्या वतीने आली होती. त्यानुसार दिनांक 12 मे 2025 रोजी धानोरा गुरव सब-स्टेशनमधून वीज जोडणी देण्यात आली.मात्र जावरा मोळवन येथे पाण्याच्या टाकीचे काम अद्याप अर्धवट असल्यामुळे प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरूच करण्यात आलेला नाही. त्यामुळे वीज कनेक्शन असूनही कोणताही वीज वापर झालेला नाही.तरीसुद्धा धानोरा गुरव महावितरण (MSEB) कार्यालयाने थेट ₹2,31,220 चे वीज बिल खंडाळा खुर्द ग्रामपंचायतीला पाठवले आहे. यामुळे या ग्रामपंचायतीला महावितरण कंपनीने चागलाच ४४० चा करंट दिला असल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच उमेश दहातोंडे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये महावितरण कंपनी विषयी संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

या प्रकरणी सरपंच उमेश दहातोंडे यांनी दिनांक 5 मार्च 2026 रोजी धानोरा गुरव येथील विद्युत विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. त्यांनी वीज वापर न झाल्याचे आपल्या तक्रारीमध्ये स्पष्ट करून बिल कमी करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या तक्रारीनंतरही धानोरा गुरव येथील महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा बिलात दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली नाही.या संपूर्ण प्रकारामुळे शासनाच्या स्मार्ट मीटर प्रणालीवर चागलेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “वीज वापर न करता एवढे मोठे बिल कसे?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ न्याय मिळावा, अशी मागणी सरपंच उमेश दहातोंडे यांनी केली आहे.
“जावरा मोळवण येथे पाणी पुरवठा योजना अद्याप सुरूच झालेली नाही,त्यामुळे वीज वापर झालाच नाही. तरीसुद्धा धानोरा गुरव महावितरणकडून ₹2.31 लाखांचे बिल ग्राम पंचायतला पाठवण्यात आले आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.आम्ही याबाबत महाविरण अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली आहे, मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या प्रकाराची सखोल चौकशी करून त्वरित बिल दुरुस्त करावे, अन्यथा ग्रामपंचायतीला महाविरण विभागाच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.” नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या घरात किंवा ग्राम पंचायतला स्मार्ट मीटर लाऊ देऊ नये.
उमेश दहातोंडे,सरपंच,ग्रामपंचायत,खंडाळा खुर्द
