संजय खाडे यांची काँग्रेसच्या प्रदेश कमिटीच्या सचिवपदी निवड.
काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार – संजय खाडे
वणी / तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेसने आपली नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील या नवीन टीमवर राजधानी दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या कार्यकारिणीत वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे धडाडीचे नेते व जिल्हा सरचिटणीस संजय रामचंद्र खाडे यांना प्रदेश सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. खाडे यांच्या निवडीची माहिती मिळताच वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.संजय खाडे यांची ओळख एक रस्त्यावर उतरून कार्य करणारे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून ते काँग्रेससोबत जुळलेले आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात अनेक स्थानिक प्रश्नांवर मोर्चा, आंदोलन करण्यात आले. नुकतेच त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील व स्थानिक प्रश्नांबाबत धरणे आंदोलन केले होते. नागरिकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणा-या एका कार्यकर्त्याला पक्षाने जबाबदारी दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. संजय खाडे आपल्या निवडीचे श्रेय खा. प्रतिभा धानोरकर, मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी,सहकारी व काँग्रेस समर्थक यांना देतात.
