
विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सन्मानपूर्वक निरोप
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
विद्यापीठातून कर्मचारी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी विद्यापीठ एक सुवास देणारी बाग निर्माण केली आणि आज ते सोडून जात आहेत, असे भावनिक प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी सहा. कुलसचिव श्री रविंद्र सयाम, कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती श्री एस.बी. तेल्हारकर, श्री एस.एल. चुंबडे, सौ. चुंबडे, श्री पी.बी. उबाळे, सौ. उबाळे, श्री व्ही.एस.मुंजाळे, सौ. मुंजाळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, खरे तर पडद्यामागील हात सातत्याने राबत होते, त्यामुळेच विद्यापीठ वेगाने प्रगतीच्या पथावर गेले आणि देशभरात आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नावलौकीक झाला. गुणवत्तापूर्ण कर्मचा-यांमुळे विद्यापीठाला यश प्राप्त करता आले, असे सांगून सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्यांनी निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी श्री एस.बी.तेल्हारकर, श्री एस.एल. चुंबडे, श्री पी.बी. उबाळे, श्री व्ही.एस. मुंजाळे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन, तर सौ. चुंबडे, सौ. उबाळे, सौ. मुंजाळे यांचा सौ. धर्माळे यांनी साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला.प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, सत्कारमूर्ती चुंबडे यांनी विद्यापीठाला उत्कृष्ट सेवा दिली आहे. त्यांनी आता सहकुटुंब भारतभ्रमण करुन आपल्या कुटुंबियांचाही उत्साह वाढवावा. तेल्हारकर यांचेही निटनेटके काम राहिले आहे. पर्यावरण संवर्धनात श्री उबाळे यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे श्री उबाळे यांचे नाव स्मरणात राहील. श्री मुंजाळे यांचीही सेवा उत्कृष्ट राहिली आहे, असे सांगून त्यांनी चारही सत्कारमूर्तींना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सत्कारमूर्ती श्री एस.बी.तेल्हारकर, श्री एस.एल. चुंबडे, श्री पी.बी. उबाळे, श्री व्ही.एस. मुंजाळे यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेल्या प्रेम, स्नेहभाव व सहकार्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त केले.
तर नियंत्रण अधिकारी श्री रवींद्र सयाम, श्री शशिकांत रोडे, तसेच विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने उपाध्यक्ष डॉ. अविनाश असनारे, कोषाध्यक्ष श्री राजेश एडले, मानद सचिव श्री श्रीकांत तायडे यांनी सत्कारमूर्ती श्री एस.बी. तेल्हारकर, श्री एस.एल. चुंबडे, श्री पी.बी. उबाळे, श्री व्ही.एस. मुंजाळे यांचा भागभांडवलाचा धनादेश व पुस्तक देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार अधीक्षक श्री धनंजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणीचे सदस्य, विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.