गोपू महामुने मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
श्रीक्षेत्र माहूर / संजय घोगरे
माहूर येथे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ए एल आय सी एम ओ कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार आ. भीमराव केराम यांच्या सूचनेनुसार गोपू महामुने मित्र मंडळ यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी सहाय्यभूत साहित्य वाटपाकरिता तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ४ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, रेणुका माता मंदिर रोड, माहूरगड येथे होणार आहे. या शिबिरात अल्मीको मुंबई येथील तज्ञ डॉक्टर्स मार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून आवश्यक असलेल्या साहित्याची नोंद करण्यात येणार आहे. तपासणीनंतर साहित्य लवकरच मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.यामध्ये अपंग व ज्येष्ठ नागरिकांना चालण्याची काठी, कंबर/गुडघ्याचे बेल्ट, स्टिक विथ स्टूल, वाकर, व्हीलचेअर, कमोड चेअर, श्रवणयंत्र आदी मिळणार आहेत. दिव्यांग बांधवांसाठी तीन चाकी सायकल, रोलॅटर, सुगम केन, स्मार्ट केन, स्मार्टफोन, मोटराईज ट्रायसायकल, सी.पी. चेअर आदी साहित्य देण्यात येणार आहे.गरजूंनी दिव्यांग प्रमाणपत्र/UDID कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला व पासपोर्ट साईज फोटो. इत्यादी कागदपत्रे घेऊन शिबिराच्या दिवशी हजर राहावे.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांच्या हाताला आधार देणे ही खरी सामाजिक सेवा आहे. कुणालाही कमीपणाची भावना न ठेवता तेही समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहेत, ही जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. याच भावनेतून मित्र मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हीच खरी सेवा आहे.
गोपू महामुने,नगरसेवक न.पं. माहूर
