गुरांसाठी चारा व सुविधा उपलब्ध; आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा
धामणगाव रेल्वे /सलील काळे
अलीकडेच प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये झाडा ग्रामपंचायतीने गुरांसाठी चारा व इतर सुविधा पुरविण्यात अपयश आल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांना सरपंच मंगेश बोबडे यांनी जोरदार उत्तर देत ते पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले आहे. ग्रामपंचायतीने गुरांसाठी पुरेसा चारा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यात चारा ठेवण्याची व्यवस्था बदलली
सरपंच बोबडे यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या काळात जुन्या खोलीत पाणी गळत असल्याने तेथे चारा ठेवणे शक्य नाही. त्यामुळे चारा गोशाळेच्या दुसऱ्या अशा खोलीत ठेवण्यात आला आहे, जिथे पाण्याची गळती होत नाही. जुन्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक रिकामी जुनी खोली दाखवून जनतेला चुकीची माहिती देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला.
गावासाठी झालेला विकास मान्य
सरपंच बोबडे म्हणाले, “आधी झालेल्या विकासाबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. उलट गावासाठी झालेला विकास आम्हाला मान्यच आहे व तो गावाच्या हितासाठीच झाला हे आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने आणि त्यापेक्षा चांगल्या रीतीने कोंडवाडा चालवत आहोत.”
राजकीय हेतूचा आरोप
ग्रामपंचायत निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येत असल्यामुळे हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बोबडे यांनी सूचित केले. काही लोक स्वतःची प्रसिद्धी करून “हिरो” बनण्याच्या प्रयत्नात अशा प्रकारचे “स्टंट” करीत असल्याचे त्यांनी म्हटले.
चारा विक्रीचा आरोप फेटाळला
दीड लाख रुपयांचा चारा साठा विकल्याचा आरोप देखील निराधार असल्याचे स्पष्ट करत बोबडे म्हणाले की, “माझ्याकडे भरपूर शेती आहे. इतकेच नाही तर माझ्या शेतीतील चारा आणि कुटारही मी गोशाळेतील गुरांसाठी उपलब्ध करून देतो. सन 24–25 या आर्थिक वर्षात एकही रुपयाचे बिल लावले असल्याचे सिद्ध करून द्यावे तसेच 8×8 च्या खोलीत दीड लाखाचे कुटार बसेल का याचे उत्तर तक्रार करताना द्यावे”
राजकीय नैराश्यातून झालेले आरोप
सरपंच बोबडे यांनी स्पष्ट केले की, गावात विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. रमाई आवाज योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना यांसारख्या विविध योजनांतून १२५ लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत. गावातील शाळा आणि इतर अनेक विकासकामांचा सपाटा अलीकडच्या काळात सुरू असल्याने काही जण राजकीय नैराश्यातून छोटेसे प्रकरण मोठे करून ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा त्यांचा दावा आहे.
कुटार उपलब्धतेबाबतही स्पष्टीकरण
गुरांसाठी कुटार उपलब्ध नसल्याचा आरोपही बोबडे यांनी फेटाळला. जुन्या कुटाराची रिकामी खोली हेतूपुरस्सर व्हिडिओत दाखविण्यात आली असून, प्रत्यक्षात दुसऱ्या खोलीत पुरेसा कुटार उपलब्ध आहे. “आम्ही जनावरांना उपाशी ठेवणारी प्रवृत्तीची माणसे नाही,” असे बोबडे यांनी स्पष्टपणे सांगितले.
