सामान्य जनतेच्या कामासाठी फासीसुद्धा कबूल
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी “जनतेसाठी सदैव कटिबद्ध” असल्याचा पुनरुच्चार करत आपली सामान्य जनतेच्या हितासाठीची बांधिलकी दृढ केली आहे. “सामान्य जनतेच्या कामासाठी फाशी सुद्धा कबूल,” असे सांगत त्यांनी भ्रष्टाचार आणि रेती तस्करीविरोधातील आपली लढाई तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जगताप यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि रेती तस्करांना ठणकावत प्रशासनाला जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते.मात्र तहसीलदारांनी त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून या प्रकरणाला नवे वळण दिले.दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रताप अडसड यांनी विधानसभेत प्रा.विरेंद्र जगताप यांच्यावर कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा आरोप केला. यामुळे स्थानिक राजकारणात वाद पेटला आहे. स्थानिक जनतेचे म्हणणे आहे की, अडसड यांनी कर्मचारी वर्गाचे प्रश्न उपस्थित करण्याऐवजी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ रोजगार हमी योजनेच्या निधीच्या निधी मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले असते, तर त्यांच्यावरील जनतेचा विश्वास वाढला असता. सध्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात भ्रष्ट अधिकारी, रेती तस्कर आणि काही राजकीय नेते यांच्यातील संभाव्य युतीबाबत जनतेत संशय निर्माण झाला आहे.जगताप यांचे “जनतेसाठी सदैव कटिबद्ध” हे विधान त्यांच्या जनसेवेच्या व्रताचे प्रतीक आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक जनतेत त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला आहे, परंतु प्रशासकीय आणि राजकीय विरोधामुळे त्यांच्यासमोरील आव्हानेही तितकीच मोठी आहेत. या प्रकरणात पारदर्शकता आणि कठोर कारवाईसाठी जनतेची मागणी वाढत आहे.
