नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथे मुद्रांक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जनता दरबार उत्साहात पार पडला.मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्या समजून घेत त्वरित व प्रभावी निराकरण केले.या जनता दरबारात मुद्रांक विभागांतर्गत दस्त नोंदणी, मुद्रांक शुल्क, दुहेरी नोंदणी, वारस नोंदी, तसेच नियमितीकरणासंबंधी नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात मांडण्यात आल्या. शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित प्रकरणांवर तात्काळ निर्णय देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी मुद्रांक विभागाचे दुय्यम निबंधक रुपेश बनसोड, कनिष्ठ लिपिक कुंडलिक राठोड व सारिका भेंडे,नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर, नगरसेवक प्रकाश मारोटकर, माजी नगरसेविका सीमा जाधव, दत्तलेखक तसेच मुद्रांक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनता दरबाराचे सूत्रसंचालन सारिका भेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांना शासनाने दिलेल्या सूचनांनुसार दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्कासंबंधी योग्य प्रक्रिया अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले.या जनता दरबारामुळे सामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी समस्या मांडण्याची व त्यावर त्वरित उपाय मिळण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
