जल जीवन मिशन अंतर्गत गावोगावी विविध उपक्रम; नागरिकांनी पुढाकार घ्यावा – संजीता महापात्र
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यात दि. ८ ते २२ मार्च या कालावधीत ‘जलमहोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील गावागावांत विविध जनजागृतीपर आणि कृतीप्रधान उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी दिली.पाणी ही केवळ पायाभूत सुविधांची बाब नसून ती सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी बनली आहे. त्यामुळे पाण्याचे संवर्धन व योग्य वापर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. जलमहोत्सवाच्या निमित्ताने गावांमध्ये पाणी समित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाणार असून प्रशिक्षित महिलांच्या साहाय्याने फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे. तसेच गावातील जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.उपक्रमांतर्गत जलस्रोतांचे पुनरुज्जीवन व स्वच्छता, पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण, सामुदायिक जलशपथ तसेच ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश यावर विशेष भर दिला जाणार आहे. गावागावात महिलांना प्रोत्साहन देऊन फिल्ड टेस्टिंग किटच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे.दरम्यान, जल जीवन मिशन अंतर्गत योजना पूर्ण होऊन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झालेल्या गावांमध्ये ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्था, युवक मंडळे, बचत गट तसेच पाणी व स्वच्छता समिती यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.जलमहोत्सवात अधिकाधिक ग्रामस्थांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) बाळासाहेब रायबोले आणि कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग स्नेहा धावडे यांनी केले आहे.
