अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण निश्चिती, सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सोमवार, दि. 6 ऑक्टोबरपासून कार्यक्रम सुरू होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. सदस्य आरक्षण निश्चिती, सोडतीचा कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती जागा निश्चितीसाठी प्रस्ताव तयार करून दि. 6 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करतील. दि. 8 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देतील. दि. 10 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासह वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढणे यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी, तर तहसीलदार पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षण काढतील. दि. 14 ऑक्टोबर रोजी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. दि. 27 ऑक्टोबर पर्यंत प्राप्त प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचनांच्या आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येईल. दि. 31 ऑक्टोबर पर्यंत प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करण्यात येईल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे,
