निवेदन,तक्रारी घेण्याची सुविधा बंद; नागरिकांना २५ किमीचा फटका.
कार्यालय तर नाहीच नाही,निवेदन द्यायलाही अडथळे.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम (सा.बा.) विभागाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने तालुक्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.नांदगाव खंडेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असून सुमारे दोन लाखांच्या जवळपास लोकसंख्या आहे.जिल्ह्यातील एकूण १३ तालुक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालये कार्यरत असताना केवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातच हे कार्यालय नसणे ही गंभीर बाब आहे. आणि हे कार्यालय नांदगाव येथे नसणे म्हणजे येथील लोकप्रतिनिधींच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.परिणामी या तालुक्यातील नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित कामे,तक्रारी किंवा निवेदने देण्यासाठी तब्बल २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बडनेरा येथे जावे लागत आहे.
सुविधा बंद; आंदोलनाचा इशारा
सुमारे पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहात या तालुक्यातील नागरिकांकडून निवेदने,पत्रे स्वीकारण्याची सुविधा सुरू केली होती.त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली होती.मात्र ही सुविधा अचानकपणे बंद करण्यात आल्याने यामध्ये अधिकाऱ्यांचा उद्देश काय ? याबाबत तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या निर्णयामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून.नागरिकांच्या वेळ आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.अधिकाऱ्यांनी केवळ आपल्या सोयीसाठी ही सुविधा बंद केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांबाबत कोणतेही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.याबाबत येथील युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तीव्र भूमिका मांडण्यात आली आहे. नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहात पूर्वीप्रमाणे निवेदन स्वीकारण्याची सुविधा तात्काळ सुरू करण्यात आली नाही तर या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात विश्रामगृह परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सातत्याने सापत्न वागणूक दिली जात असल्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचा आरोप करण्यात येत आहे.या गंभीर विषयाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष घालून नांदगाव खंडेश्वर तालुकावासीयांची मागणी मंजूर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अमरावती विभागाचे अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.याबाबत बडनेरा येथील उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अमरावती येथील कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपण नव्यानेच रुजू झालो असून आपणास काहीच माहिती नसून माहिती घेऊन सांगतो असे उत्तर देऊन वेळ मारून नेली.
