पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया पूर्ण होणार
मुंबई /मंत्रालय प्रतिनिधी
राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र दोन महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच अमलात आणणार असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी ही दोन्ही महामंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

विधानसभेत भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना मांडत पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी मांडलेल्या मागण्यांचाही संदर्भ देण्यात आला.सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्यामुळे पत्रकार संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर सरकार या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.यासंदर्भात पत्रकार संघटना आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन अधिवेशन संपताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सन्मानधन योजनेत बदलाची शक्यता
दरम्यान, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मानधन योजनेतही बदल करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. सध्या या योजनेचा लाभ ३० वर्षे पत्रकारिता केलेल्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना दिला जातो. मात्र पुढे केवळ ३० वर्षांची पत्रकारिता हीच अट ठेवण्याचा प्रस्ताव असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.
