आमदार प्रतापदादा अडसड यांची मागणी
चांदूर रेल्वे/ तालुका प्रतिनिधी
राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात धामणगाव रेल्वे मतदारसंघातील धामणगाव रेल्वे व चांदुर रेल्वे तालुके तसेच जिल्ह्यातील इतर सहा तालुके वगळण्यात आलेली आहेत.

या संदर्भात आमदार प्रतापदादा अडसड, आमदार राजेषभाऊ वानखडे यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णयान्वये राज्यातील २५३ तालुक्यांना माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती घोषित करण्यात आल्या आहेत. परंतु धामणगाव रेल्वे व चांदुर रेल्वे तालुक्यात तसेच या व्यतिरिक्त जिल्ह्यातील आणखी सहा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून देखील सदरील तालुके वगळण्यात आलेली आहेत. यातूनच शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संतापाचे व मोठ्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शेतात उभी पिके पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे, यामुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात धामणगाव रेल्वे व चांदुर रेल्वे तालुक्यांचा तसेच जिल्ह्यातील वगळलेल्या इतर सहा तालुक्यांचा सुद्धा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रतापदादा अडसड यांनी केली. यावेळी विभागीय आयुक्त यांनी काही तांत्रिक बाबीमुळे सदरहू तालुक्याचा समावेश झाला नसून लवकरच यासंदर्भात निर्णय येतील व आम्ही अहवाल यासंदर्भात पाठविल्याचे स्पष्ट केले. सोबतच आमदार प्रतापदादा अडसड यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, कृषिमंत्री श्री.दत्तात्रयजी भरणे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री.गिरीशजी महाजन, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पत्रान्वे धामणगाव रेल्वे व चांदुर रेल्वे व जिल्ह्यातील आणखी सुटलेले सहा तालुके समाविष्ट करण्याची मागणी केली.
