पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
आयटीआयमध्ये कार्यक्रम थाटात पार पडला
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
उद्योगांच्या गरजेनुसार युवक-युवतींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अल्पमुदतीचे व अल्पदरातील कौशल्यविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. बुधवारी (दि. ८) दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या अभ्यासक्रमांचे उद्घाटन संपन्न झाले. या सोहळ्याचा थेट प्रक्षेपण कार्यक्रम नांदगाव खंडेश्वर आयटीआयमध्ये उत्साहात पार पडला. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समित सिंघई होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वायईएस इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नारायण सोनोने, शिक्षक दिनेश जाधव, विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी उत्तमराव ब्राम्हणवाडे, तसेच प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी आयटीआयचे प्रशिक्षणार्थी, स्थानिक शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम थेट पाहिला. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि काहींनी आपले मनोगत व्यक्त केले.

नांदगाव खंडेश्वर आयटीआयमध्ये नेल टेक्निशियन, सेल्फ एम्प्लॉइड टेलर, शिवण मशीन ऑपरेटर, टी.आय.जी. वेल्डिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट, सायबर सिक्युरिटी, असिस्टंट प्लंबर (जनरल) आणि डिजिटल मित्र अशा आठ अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांना तात्काळ सुरुवात होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेतील शिल्प निदेशक राजेंद्र उन्होंणे, राजकुमार धोटे, तुषार जैन, प्रफुल्ल कचरे, वैभव जाधव, निलेश देऊळकर, राम इखार, शहजाद खान, सुशिल सरोदे, सागर डांगे, चिन्मय दहाट, वैभव केणे, प्रशांत पोच्ची, सचिन वाहणे, सचिन दुवदने, मयुरी वसुले, रूचिका डोरस, संगिता बिबेकर, दिपाली लोखंडे, रूपाली लांडे, तसेच सुरक्षारक्षक जयेश काटोलकर, धर्मदीप राणेकर, कर्मचारी गौरव मोगरे व प्रशिक्षणार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
