
ब्लॅक स्पॉट शोधून दुरूस्ती कार्याला सुरूवात
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
मेळघाटात महावितरणची वीज असलेल्या जरीदा परिसरातील दुर्गम गावात प्रत्यक्ष भेट देत महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी वीज समस्येबाबत माहिती घेतली, सुरळीत वीजेसाठी देखभाल दुरूस्तीच्या कार्याला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली , तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित महावितरण कार्यालयात तक्रार आल्यास, तक्रार सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे यांनी दिली. अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे यांनी पुढाकार घेत उपकार्यकारी अभियंता ,निलेश बोरीकर,वितरण केंद्र प्रमुख अजय टाले व कर्मचारी यांच्यासह जरीदा भागातील जरीदा कुही,हातरू,रूही,पाथर,डोमा,एकताई ,सलीता,भांडूम,बोदू आणि सुमिता या गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या,वीज पुरवठ्यात नियमित निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत ग्रामस्थांसोबत चर्चा करून उपायोजना करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले.
तसेच यावेळी आरोग्य केंद्र,आश्रम शाळा,पाणी पुरवठा योजना आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत ब्लॅक स्पॉट पडताळणी करून दुरूस्ती कार्याला सुरूवात करण्यात आली.मेळघाटातील या दुर्गम भागात महावितरणकडून वीज पुरवठा होणाऱ्या गावात प्रत्यक्षात ग्राहकांची संख्या अत्यंत कमी आहे.वीज ग्राहकांनी वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना तत्काळ वीज जोडणी देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच मेळघाटतील हा भाग अतीदुर्गम आणि व्याघ्रप्रकल्पाचा भाग आहे,भौगोलिक परिस्थितीसह जंगली जनावरांमुळे आपात्कालिन परिस्थितीत दुरूस्ती कालावधीला थोडा वेळ लागतो,त्यामुळे या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहनही कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे यांनी केले आहे.