अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अमरावती येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने (HVPM) आयोजित केलेले वार्षिक दसरा (विजयदशमी) प्रात्यक्षिक हा केवळ एक स्थानिक उत्सव नसून, ती भारताच्या स्वदेशी क्रीडा संस्कृतीचे एक सशक्त उदाहरण आहे. या वर्षी या प्रात्यक्षिकांचे १०१ वे वर्ष आहे.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाशी जोडलेला आणि शतकोत्तर पल्ला गाठलेला हा उपक्रम क्रीडा संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी करत असलेल्या संस्थेच्या अविरत प्रयत्नांचा आणि वचनबद्धतेचा पुरावा आहे.१९१४ मध्ये अनंत कृष्णाजी वैद्य आणि अंबादास कृष्णाजी वैद्य या दूरदृष्टीच्या वैद्य बंधूंनी एका लहान व्यायामशाळेची स्थापना केली, ज्याला त्यांनी “हनुमान क्लब” असे नाव दिले. ब्रिटिश राजवटीत तरुणांना गुप्तपणे प्रशिक्षित करून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी सक्षम बनवणारी राष्ट्रप्रेमी संस्था तयार करण्याची धुरा हनुमान क्लबने समर्थपणे उचलली.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जसजशी गती मिळाली तसतशी व्यायामशाळेनेही गती घेतली. शारीरिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अंबादासपंतांच्या नेतृत्वात संस्थेचे भारतभर प्रात्यक्षिक दौरे होत असत. या व्यायामशाळेच्या माध्यमातून १९२४ पासून उन्हाळी व्यायाम वर्ग सुरू करण्यात आले आणि १९२५ पासून व्यायामशाळेच्या वार्षिकोत्सवाची सुरुवात झाली.
*प्रात्यक्षिकांचा श्रीगणेशा:*
क्रीडा महर्षी अंबादासपंत वैद्य यांनी तरुणांना सामाजिक योगदानाची जाणीव करून देत सामाजिक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी १९३२ साली नागरी संरक्षण दल या स्वतंत्र शाखेची स्थापना केली. या शाखेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचे औपचारिक सादरीकरण या संकल्पनेतून उदयास आलेली ही या मागची मूळ कल्पना. मात्र १९३२ साली नागरी संरक्षण दलाच्या पहिल्या सादरीकरणापासून व्यायामशाळेच्या वार्षिकोत्सवाचे रूपांतर दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या सामूहिक कवायतींमध्ये झाले. ही सामूहिक कवायत आजतागायत अविरतपणे दिवशी सुरू आहे. पारंपरिक व्यायाम प्रकारांना शिस्त, विविधता आणि आधुनिकतेची जोड देऊन केली जाणारी ही प्रात्यक्षिके म्हणजे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा वार्षिक समुच्चय असतो; ज्यात शारीरिक शिक्षण पदवी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर शालेय विभागांमधील तीन ते चार हजार विद्यार्थी सहभागी होतात. या प्रात्यक्षिकांचे वैशिष्ट्य म्हणजे एकसमान सामूहिक कवायती, ज्याद्वारे आपल्याला अतुलनीय अचूकतेचे दर्शन होते.
*मुख्य आकर्षणे:*
*मल्लखांब:* गुरुत्वाकर्षणाला आव्हान देत खांबावर आणि दोरीवर केला जाणारा शारीरिक हुकुमतीचा व्यायाम प्रकार.
*मशाल कवायत:* विद्यार्थी पेटलेल्या मशाली हाताळत तालबद्ध व्यायाम करतात. हे शौर्य आणि ज्ञानाचा प्रकाश यांचे प्रतीक आहे.
*प्राचीन युद्धकला:* ढाल-तलवार, लाठी-काठी आणि दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक शस्त्रकलेचे प्रदर्शन केले जाते, जे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक युद्धकलेच्या अनुभवाची जोड देते.
*विविधतेत एकता:* एचव्हीपीएम मध्ये भारतातील २५ पेक्षा अधिक राज्यांतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, त्यामुळे हे प्रात्यक्षिक एका अर्थाने भारत दर्शन असते. ज्यात प्रामुख्याने शारीरिक कवायतींसह विविध सांस्कृतिक घटकांचा समावेश असतो.*आधुनिक खेळ आणि जिम्नॅस्टिक्स:* या कार्यक्रमात अनेकदा एरोबिक्स, तायक्वांदो आणि जिम्नॅस्टिक्स या सारख्या आधुनिक खेळांचा समावेश असतो.*सांस्कृतिक जतन:* या प्रात्यक्षिकांमुळे लुप्त होत चाललेल्या पारंपरिक भारतीय शारीरिक कला व क्रीडा प्रकारांचे जतन होऊन ते नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचतात.*समर्पण आणि चिकाटी:* कितीही जोरदार पाऊस किंवा प्रतिकूल हवामान असले तरीही कोणत्याही कारणाने ही प्रात्यक्षिके थांबवली किंवा पुढे ढकलली जात नाहीत.अशा प्रकारे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे होणारे दसरा प्रात्यक्षिक हा एक प्रभावी सांस्कृतिक उपक्रम आहे. जो की व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक प्रयत्न, देशभक्तीचा इतिहास आणि शरीर व मन यांच्या संगोपनासाठी शतकानुशतके चाललेल्या समर्पणाचा शिस्तबद्ध पुरावा आहे.
डॉ. निलेश जोशी
श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती.
