स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अचलपूर / तालुका प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अचलपूर येथील हरम नाका परिसरातून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसेसह एक तरुण ताब्यात घेतला असून त्याच्यावर शस्त्रबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. विशाल आनंद यांनी जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर, ९ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा,अमरावती ग्रामीणच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरम नाका, अचलपूर येथे छापा टाकून दुर्गेश ज्ञानेश्वर विजेकर (वय २१ वर्षे, रा. अब्बासपुरा, अचलपूर) याला ताब्यात घेतले.पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोसलेले देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे (एकूण किंमत अंदाजे ₹२६,०००) आढळून आली. पिस्टल आणि काडतुसे बाळगण्यासंदर्भात विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सदर शस्त्र व काडतुसे जप्त केली आहेत.या प्रकरणी सरमसपुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ३ व २५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वीही आरोपीवर अवैधरित्या दारू विक्री आणि गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. या शस्त्राची तोतयागिरी कशी झाली, कोठून आणले आणि यामागील उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश चावडीकर (ठाणेदार, सरमसपुरा), सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पो.उ.नि. शिवचरण मडघे, पोलीस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने व चालक अनिकेत पाचपोर यांच्या पथकाने केली.

