ओबीसी महिला आरक्षणाने पुरुष उमेदवारांचे स्वप्न धुळीस
नांदगाव पेठ/ मंगेश तायडे
नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये येत्या निवडणुकीसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर होताच राजकीय समीकरणांमध्ये अक्षरशः भूकंप झाला आहे. मागील दहा वर्षांपासून मतदारसंघात जोमाने कार्यरत असलेल्या कार्यसम्राट पुरुष उमेदवारांचे सारे गणितच कोलमडले आहे.या सर्कलमध्ये गेल्या काही वर्षांत जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि पक्षनिष्ठेच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या अनेन इच्छुक पुरुषांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. पण सोमवारी अचानक जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे त्यांचे सगळे स्वप्न धुळीस मिळाले आहे.नांदगाव पेठ सर्कलमधील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दहा वर्षे घाम गाळून उभं केलेलं जनाधार एका फटक्यात हिरावून घेणं ही अन्यायकारक गोष्ट आहे,” असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, या घडामोडीमुळे सर्कलमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले असून नवे समीकरणे तयार होण्याची चिन्हे आहेत. ओबीसी महिला आरक्षणानंतर अनेक प्रभावशाली महिला कार्यकर्त्यांची नावे पुढे येऊ लागली आहेत. कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, कोणाचा डाव सफल होणार, आणि पुरुष उमेदवार या बदलाला कशी प्रतिक्रिया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.एकूणच, नांदगाव पेठ सर्कलमधील ही आरक्षणाची घोषणा निवडणुकीच्या आधीच राजकीय रंगत वाढवणारी ठरली आहे.आरक्षणाच्या नव्या यादीत “ओबीसी महिला” हा उल्लेख होताच, अनेक इच्छुक पुरुष कार्यकर्त्यांचे गणित बिघडले.

गेल्या दशकभरात त्यांनी जनतेत विश्वास निर्माण केला. आता निवडणूक तोंडावर असताना अचानक आरक्षण बदलल्याने आमचे प्रयत्न पाण्यात गेले, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.एकंदरीत दहा वर्षांचा संघर्ष एका आरक्षणाने व्यर्थ झाला अशी भावना सुद्धा व्यक्त होत आहे.
महिला कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित
दरम्यान, या घोषणेने काही महिला कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र वाढला आहे. अनेकांनी या सर्कलमध्ये उमेदवारीसाठी तयारी सुरू केली असून, त्यांची नावे स्थानिक पातळीवर चर्चेत आहेत. काही प्रभावशाली महिला कार्यकर्त्यांना आता पक्षांकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.“ओबीसी महिला आरक्षण म्हणजे संधीचं सोनं करण्याची वेळ आहे. महिलांनी पुढे येऊन विकासाचं नेतृत्त्व घ्यावं,” अशी प्रतिक्रिया महिला नेत्या मनीषा विवेक गुल्हाने यांनी दिली.
राजकीय रंगत वाढली
नांदगाव पेठ सर्कल हे नेहमीच जिल्हा परिषदेतील चर्चेचे केंद्र राहिले आहे. आता ओबीसी महिला आरक्षणामुळे ही रंगत आणखी वाढली असून, प्रत्येक पक्षात रणनीती आखली जात आहे. कोणाचा डाव यशस्वी ठरणार, कोणाचं गणित बिघडणार, आणि नव्या महिला चेहऱ्यांना मतदार कितपत स्वीकारतो हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.एकूणच, नांदगाव पेठ सर्कलमधील ही आरक्षणाची घोषणा ही केवळ औपचारिक बाब न राहता, संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय चित्रात हलकल्लोळ माजवणारी ठरली आहे.निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या उलथापालथीने सगळ्यांचेच लक्ष आता या सर्कलकडे लागले आहे.
पंचायत समिती गण ठरणार निर्णायक
नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत नांदगाव पेठ आणि माहुली जहागीर हे दोन पंचायत समिती गण आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. नांदगाव पेठ गण ओबीसी सर्वसाधारण तर माहुली जहागीर गण अनुसूचित जमाती महिला आरक्षणासाठी निश्चित झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गणांमधील उमेदवार आगामी निवडणुकीतील राजकीय गणित पूर्णतः बदलवू शकतात.
