चांदूरबाजार /एजाज खान
आरोग्य हीच खरी संपत्ती” या विचाराने प्रेरित होऊन गो. सी. टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालय, चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.या शिबिरात तपासणीसाठी विविध तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. संध्या खराते (जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती) यांनी मुलींशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक शंका दूर केल्या. त्यांनी वैद्यकीय तपासणीसह आवश्यक वैद्यकीय सल्ला, औषधनिर्देश आणि औषधांचे वाटपही केले. आहारतज्ञ श्रीमती रश्मिता दिघडे (संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती) यांनी पोषणयुक्त आहाराचे महत्त्व पटवून देत मुलींना “आरोग्यविषयक तंदुरुस्तीचा कानमंत्र “ दिला. त्यांनी साध्या भाषेत आहाराचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले, जे विद्यार्थिनींना त्यांच्या दैनंदिन जीवनात सहज अमलात आणता येईल. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने श्रीमती अश्विनी म्हैसने (समुपदेशक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती) यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या मनातील गोंधळ, चिंता आणि अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या समुपदेशनामुळे अनेक मुलींना मानसिक आधार मिळाला. श्री. शाकीर शाह (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चांदूरबाजार) यांनी क्षय रोगाची लक्षणे आणि निदान याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कुष्ठरोग आणि त्वचाविकारांबाबत श्री अनिल गवळी यांनी त्वचासंबंधी समस्या समुपदेशन केले. या शिबिरात ICTZ विभागाच्या राजश्री अतकरे (समुपदेशक), श्री विशाल भोंबे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), श्री अनंत वायझाडे आणि श्रीमती मीना बांगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय योगदानामुळे शिबिर अधिक प्रभावी ठरले.गो.सी.टोम्पे सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष माननीय भास्कर दादा टोम्पे आणि सचिव डॉ. विजय टोम्पे यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास आणि आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होत. आमचे महाविद्यालय नेहमीच अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील अशी आशा व्यक्त करत त्यांनी शिबिराच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी शरीराला निरोगी ठेवा कारण ते तुमच्या आयुष्याचे मंदिर आहे, असे कळकळीचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. प्रिया देवळे, डॉ. निधी दीक्षित ,डॉ. मंजुषा पवार यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला. या शिबिरामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
