सालोड गावातील ग्रामस्थांचा गंभीर आरोप
सालोड कसबा/अंकुश निंमनेकर
सालोड गावात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पात्र असलेल्या अनेक कुटुंबांना अपात्र ठरवण्यात आले असून, काही चांगली पक्की घरे असलेल्या व्यक्तींना घरकुल मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.ग्रामस्थांच्या मते, घरकुल मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, जिओ टॅग केलेल्या फोटोंच्या आधारे चुकीच्या पद्धतीने मंजुरी देण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये घरकुल सचिवांकडून पैसे घेऊन अपात्र लाभार्थ्यांना मंजुरी दिल्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.याशिवाय, ग्रामपंचायतीने सन 2024-25 मध्ये घरपट्टी (घर कर) वसूल करूनही त्या निधीचा नेमका वापर कुठे झाला याची माहिती ग्रामस्थांना दिली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.तसेच, ग्रामसेवक व संबंधित कर्मचाऱ्यांवरही कामकाजात निष्काळजीपणा व दुर्लक्ष केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. काही ग्रामस्थांनी रोजगार सेवकाच्या कामकाजाबाबतही तक्रारी नोंदवल्या असून, गरजू लोकांकडून पैसे मागितल्याचेही सांगितले जात आहे.या सर्व प्रकारांमुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बैठकीत एकत्र येऊन संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, पात्र लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल मंजूर करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.ग्रामस्थांनी या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
