सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांच्या पाठपुराव्याला यश
निधी मागणीसाठी गटविकास अधिकारी यांचे वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्र
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खचलेल्या विहिरीच्या दुरुस्तीकरिता निधीची तरतूद करण्यात यावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी 18 ऑगस्ट 2025 पासून प्रशासन दरबारी सातत्याने पत्रव्यवहार सुरू केला होता. तसेच याबाबत विविध वृत्तमाध्यमांतूनही हा प्रश्न मांडण्यात आला. दिवटे यांनी वर्धा येथील खासदार अमर काळे, आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे तसेच माजी आमदार विरेंद्र जगताप यांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा केला. अखेर त्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासन स्तरावर याबाबत हालचाली सुरू झाली आहेत. नांदगाव खंडेश्वर येथील गटविकास अधिकाऱ्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींसाठी निधीची मागणी सादर केली असल्याची माहिती मिळाली आहे.तथापि काही लाभार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटींमुळे पंचायत समितीत प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रस्तावांवर नियमानुसार तातडीने कार्यवाही करून उर्वरित लाभार्थ्यांनाही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी केली आहे.

शासन निर्णय असूनही निधी वितरणात प्रशासनाची हलगर्जी
सन 2025-26 च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने शासन निर्णय मग्रारो-2025 प्र.क्रमांक 79 मग्रारो-5, दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केला होता. या निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आले होते.मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पंचायत समिती व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना निधी वितरित करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप मोरेश्वर दिवटे यांनी केला आहे.परिणामी तालुक्यातील अर्ज केलेले अनेक शेतकरी प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे अशा कामचुकार संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून तातडीने लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी सुद्धा सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
