
विलास पाटील यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरल्याचे फलित
वरूड / तालुका प्रतिनिधी
मागील वर्षी ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसानीमुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर झाली असली तरीही ती अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने प्रचंड नाराजी होती. मात्र, या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी वेळोवेळी प्रशासन आणि संबंधित खात्यांकडे पाठपुरावा केला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून नुकतेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केलेल्या निधीअंतर्गत या भरपाईची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये सुध्दा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यासाठी बँक आणि महसूल प्रशासनामध्ये समन्वय साधण्यात आला आहे. शासनाच्या कोणत्याही योजनांचा खरा लाभ हा तेव्हा पोहोचतो जेव्हा स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते सक्रिय राहतात. विलास पाटील यांचे हे उदाहरण इतरांनाही प्रेरणादायी ठरू शकते.
विलास पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
विलास पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा निवेदने दिली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यांनी संबंधित खात्यांशी थेट संवाद साधत हा मुद्दा सातत्याने लावून धरला. यामुळे प्रशासनाला जाग येऊन निधी वितरणाची प्रक्रिया गतिमान झाली.
शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट :
शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होत असल्याची माहिती मिळताच अनेक ठिकाणी समाधान व्यक्त केले जात आहे. “विलास पाटील यांनी वेळोवेळी आमच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवल्या. त्यामुळेच आज आमच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो,” असे प्रतिपादन नितीन पेलागडे यांनी केले.
उर्वरित शेतकऱ्यांसाठी प्रशासन सज्ज :
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत, त्यांच्यासाठी महसूल प्रशासन विशेष मोहीम राबवून बँक खात्यांची पडताळणी करत आहे. कोणत्याही कारणाने रक्कम अडकली असल्यास ती लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.