
जिल्हाधिकारी आशिष येरेकरयांचे प्रतिपादन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात येतात. यातील देयक अदा करण्याची कार्यवाही समाधानकारक नाही. कामांची देयके सात दिवसांच्या आत अदा करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कार्यवाही करावी. येत्या काळात रोजगार हमीची देयके वेळेत अदा करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा अंतर्गत सर्व यंत्रणांची कामकाजविषयक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कासोदे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, मनरेगामध्ये मस्टर दिल्यानंतर रोजगार सेवकांकडून सात दिवसांच्या आत मस्टर जमा करण्यात यावे. यासाठी रोजगार सेवकांची तालुकास्तरावर बैठक घेण्यात यावी. यात मस्टर जमा करण्यासाठी समन्वय साधण्यात यावा. प्राप्त झालेली मस्टर अपलोड करण्याची कार्यवाही तातडीने करावी. सात दिवसांचे देयक तातडीने अदा करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे. तसेच देयक जमा करण्यासाठी आधारबाबत येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात. सध्या मनरेगा अंतर्गत घरकुलांचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. मनरेगामध्ये अकुशलचा निधी प्राप्त होत आहे. मात्र कुशलचा निधी प्राप्त होण्यास वेळ लागत आहे. कुशलचा निधी प्राप्त झाल्यानंतर कामे पूर्ण करून त्याचा अहवाल तातडीने देण्यात यावा. सध्या पावसाळा सुरू असल्याने मनरेगा अंतर्गत गाळ काढणे, रस्त्याची कामे घेऊ नये. विविध यंत्रणांनी केलेली कामे तपासण्यात येत आहे. केवळ कुशलच्या निधीअभावी कामे राहणे अपेक्षित आहे. काही यंत्रणांची गेल्या कालावधीचीही कामे पूर्ण झालेली नाही, ही कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी वन, कृषी, सामाजिक वनीकरण आदी यंत्रणांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.