पंचायत समिती दर्यापूर येथे तीव्र आंदोलनाचा इशारा
दर्यापूर /रामेश्वर माकोडे
दर्यापूर तालुक्यातील येवदा परिसरातील गोरगरीब मजुरांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी नमुना क्र. 4 नुसार रोजगाराची मागणी केली होती. परंतु तब्बल सात महिने उलटूनही ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाने या मजुरांच्या मागणीस प्रतिसाद दिला नाही. मजुरांना आजपर्यंत ना रोजगार मिळाला, ना रोजगार भत्ता.दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची सर्व कामे ठप्प झाली असून ग्रामीण मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्यांचा रोजगार भत्ता तातडीने देण्यात यावा व रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी मजुरांकडून होत आहे.याच अनुषंगाने मेळघाट अमरावती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी पंचायत समिती दर्यापूर येथे प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “गोरगरीब मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही तर पंचायत समिती दर्यापूर येथे तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.ग्रामीण मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. रोजगार हमी योजनेतून रोजगार व रोजगार भत्ता मिळणे हा मजुरांचा कायदेशीर हक्क असून, त्याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
